Wednesday, October 8, 2008
शनिवार ते शनिवार.....
शनिवार ते शनिवार. दहशतवाद्यांनी देशाच्या राजधानीला एका पंधरवड्यात दुसऱ्यांदा बॉम्बस्फोटांनी हादरवले आणि नवरात्रीच्या तोंडावर सर्वसामान्य दिल्लीकरांच्या मनातील असुरक्षिततेची आणि हतबलतेची भावना पुन्हा टोकदार झाली. गेल्या 13 सप्टेंबरला दिल्लीच्या भरवस्तीत झालेले साखळी स्फोट, पुढच्याच शनिवारी संशयित अतिरेक्यांना चकमकीत मारल्याचा पोलिसांनी केलेला दावा आणि बरोबर आठ दिवसांनी म्हणजे आज झालेला हा बॉम्बस्फोट पाहता गुप्तचर संस्था आणि दिल्ली पोलिसांना आणखी "उघडे पाडणारे' हे स्फोट असल्याचे मानले जाते. गेल्या काही वर्षांत घातपाती कारवायांत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दाखविणाऱ्या अनेक घटना घडल्या. नुकतेच 13 सप्टेंबरला राजधानी दिल्लीतही साखळी बॉम्बस्फोट झाले. त्यानंतर दिल्लीत "हाय ऍलर्ट' जारी झाला, रस्त्यांवर पोलिसांची फौज वाढली, गस्त वाढली, चौकाचौकांत नाकेबंदी करण्यात आली, पण जेव्हा दहशतवाद आपली पाळेमुळे समाजात खोलवर रोवतो, तेव्हा असे उपाय प्रसंगी किती वरवरचे ठरू शतकात, हेही आजच्या स्फोटांनी ठळकपणे दाखवून दिल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गुप्तचर विभागाला आजच्याही स्फोटांची काहीही माहिती नव्हती आणि चकमकीचे श्रेय घेणारे दिल्ली पोलिसांची कार्यक्षमता (?) आठ दिवसांतच उघडे पडतात हेही दिसून आले आहे. "खबऱ्यांचे जाळे' विणण्यात गुप्तचर संस्था आज अपयशी ठरल्याचेही पुन्हा स्पष्ट झाले. कमी क्षमतेचे स्फोट, पण ते भरवस्तीत करून जास्तीत जास्त हानी करण्याचे आणि नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना टोकदार करण्याचे तंत्र तर दहशतवाद्यांना अवगत झाले आहेच; पण बॉम्बस्फोटांनंतरच्या शनिवारी पोलिस चकमक घडवून दोघा अतिरेक्यांना मारल्याचा दावा करतात त्याच्या आठव्याच दिवशी हे स्फोट घडवून दहशतवाद्यांनी पोलिसांना एक प्रकारे आव्हान दिल्याचेही मानले जाते. खोलवर झिरपलेल्या या दहशतवादाच्या भस्मासुराला मारणारे सरकार या देशात अस्तित्वातच नाही काय, हा प्रत्येकाच्या नजरेतला प्रश्न आज घटनास्थळी जमलेल्या नागरिकांच्या डोळ्यांमध्ये वाचायला मिळत होता. पोलिसांबद्दल तर महरौलीतील नागरिक फारच चिडून बोलताना आढळले. नवरात्रीचा उत्सव अवघ्या तीन दिवसांवर आला आहे. दिल्लीतही गेल्या काही वर्षांपासून नवरात्रीत गच्च गर्दीत चालणाऱ्या दांडियांची धूम असते. अशा स्थितीत आज पुन्हा झालेल्या या स्फोटांनी दिल्लीकरांच्या सुरक्षिततेपुढेच मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. संघटित दहशतवादाच्या सावटाखाली असलेल्या या राजधानीला त्यातून मुक्ती कधी मिळणार हा आज प्रत्येक दिल्लीकराचा सवाल आहे. सध्या तरी त्याचे उत्तर त्यांच्यावर राज्य करणाऱ्या कोणत्याच पक्षाकडे नाही. आज दुपारी ज्या महरौली भागात स्फोट झाले ती वेळ तुलनेने शांत असली तरी हा फूल बाजार हा कायम गर्दीचा भाग मानला जातो. कुतुबमिनारमुळे महरौली परिसरामध्ये देशी-विदेशी पर्यटकांचा राबताही सतत असतो. मात्र आजचा स्फोट ज्या पद्धतीने झाला तो एक घातपाती "अपघात' होता काय यादृष्टीनेही पोलिस तपासाची चक्रे फिरू लागली आहेत. एका जेवणाच्या डब्यात (टिफीन) बॉम्ब घेऊन मोटारसायकलवरून आलेल्या "त्या' युवकांनी फेकलेला डबा हा चुकून पडला असेल. त्याबद्दल त्यांना सांगावे, अशा भावनेने तो डबा हातात घेतलेल्या बालकाच्या शरीराच्या पुढच्या काही मिनिटांतच ठिकऱ्या उडाल्या. आजच्या स्फोटात मारल्या गेलेल्या वा जखमी झालेल्या नागरिकांमध्ये संतापाबरोबरच प्रचंड भीतीची भावना जाणवली. रोजीरोटीसाठी सकाळी घराबाहेर टाकलेले पाऊल पुन्हा घरात सुरक्षितपणे येईल याची खात्रीच नसल्याची भावना आज प्रत्येक सामान्य दिल्लीकर बोलून दाखवत आहे. राजकारणी लोकांवरचा त्याचा विश्वास कधीचाच उडाला आहे. त्यात आता भर पडली आहे एक प्रकारच्या हतबलतेची. दिल्ली महापालिकेत सत्ता भाजपची, तर विधानसभा आणि केंद्रात कॉंग्रेस आघाडीची. त्यामुळे आजही या रंगपंचमीला पुन्हा ऊत आला. यात ज्या सामान्यांच्या मतांवर आपण राज्य करतो त्याला सत्ताधाऱ्यांनीच वाऱ्यावर सोडले, अशी भावना लोकांमध्ये प्रबळ होताना दिसते, ती अतिशय घातक.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment