एक अनुभव नीलाकाशातला !!
-------------------------
आकाशातून, ता. 14 सप्टेंबर 2008 (! ) ः स्पाईस जेटच्या विमानात रात्री 8 वाजून 45 मिनिटांनी , 37 हजार फूट उंचीवरून मी लिहित असलेला हा मजकूर ! महाराष्ट्राच्या बाहेर घालविलेली गेल्या 35 वर्षांतली...आयुष्यातली ही पहिलीच अनंत चतुर्दशी. एक अनामिक हुरहुर वेढून राहिलेली....दरिदरीतून, मावळदेवा। देऊळ सोडून धाव रे..... काळी दोनमध्ये सफाईनं फिरणाऱ्या लताच्या मधाळ आवाजातल्या, शांता शेळकेंच्या या ओळी आठवल्या की काहीसा दिलासा मिळत रहातो ! या सायंकाळी भर विमानात काळजातून थेट लॅपटॉपच्या पडद्यावर अवतरणारी ही "मौनाची भाषांतरे !'बंगळूरचा चकाचक आंतरराष्ट्रीय विमानतळ......सायंकाळी सात वाजून वीस मिनिटांनी या विमानतळावर पत्रकारांची फौज 'अवतरते'...काही क्षणांतच विमानाकडे एका व्होल्वहो बसमधून प्रस्थान सुरू ! भाजप नावाच्या दिल्लीच्या तख्ताच्या दिशेने कूच करणाऱ्या पक्षाचा तीन दिवसांचा उरूस आज संपला आणि तो कव्हर करण्यासाठी दिल्लीहून आलेल्या 50 हून जास्त पत्रकारांना घरचे वेध लागलेले. कालच (13 सप्टेंबर 2008) दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटांनी अनेक कुटुंबवत्सलांचं चित्त घराकडे, घरांतल्या पिल्लांकडे लागलेलं.तरीही विमानाने हवेत झेप घेताच पत्रकारांची मूळ वृत्ती उफाळून आली आणि नंतर सुरू झाला एकच दंगा ! एक पत्रकार जागेवर बसलेला राहील तर शपथ !! हास्याचे फवारे उडत आहेत...जोरजोरात विनोद करणे, विमानातील विक्रीसाठींच्या वस्तूंवरून हवाई सुंदरीच्या फिरक्या घेणे हे सगळेच सुरू आहे. इतक्यात घोषणा होते, ""आम्ही आज वाढदिवसाच्या सुभेच्छआ देत आहोत ; संजय मयूर यांना. त्याबरोब टाळ्यांचा उस्फूर्त कडकडाट होतो. संजय हा भाजपच्या राष्ट्रीय कार्यालयातला कर्मचारी, पत्रकारांचा मित्र. हा मूळचा बिहारचा असला तरी त्याचे बोलणे उर्मट आणि असंस्कृत नसून अतिशय मार्दवयुक्त आहे. साहजिकच त्याच्या वाढदिवसानिमित्तच्या घोषणेला टाळ्यांचा कडकडाट होतो. खुद्द संजयला मात्र उपास आहे. कसला? तर अनंत चतुर्दशीचा ! गेली अनेक वर्षे मी हे व्रत करतोय, संजय सांगत असतो. बंगळूरला जाण्याच्या दिवशी (11 सप्टेंबर) जे विमान होते त्यात भाजपचे बरेच नेते होते. त्या दिवशी विमानात हिमाचलाचे माजी मुख्यमंत्री शांताकुमार भेटले. हिमाचलच्या निवडणूक दौऱ्यात नुरपूर-जस्सौर पट्ट्यात मी त्यांची मुलाखत घेतली होती. त्यांना तीही पक्की लात आहे...पक्का राजकारणी नेता ! त्यांचाही वाढदिवस त्या दिवशी होता ामि तो विमानातच साजराही झाला. पण कोरडेपणाने. संजयने आपुलकीने दिलेल्या लिंबाच्या सरबताच्या बाटलीतील सरबताची चव आमि तो उत्साह शांताकुमारांच्या अभिनंदनावेळी दिसतच नव्हता. ...आज संध्याकाळी हॉटेल वूडलॅंडमधून व्होल्हे बसने निघून बंगळुरूच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाय ठेवला तेव्हा सर्वांनाच एक प्रकारचं हायसं वाटू लागलेलं. रात्री आठ वाजून तीन मिनिटांनी विमानानं हवेत उड्डाण घेतलं आणि झगमगतं बंगळूर शहर खाली दिसू लागलं. उतरली तारकादळे जणू नगरात....(सलाम कुसुमाग्रज !) हा अनुभव याचि देही याचि डोळा पाहिला. ही अविस्मरणीय अनुभवाची कुपी शब्दांत बध्द करता येणारी नाहीच प्रत्यक्ष अनुभवण्याचाच हा भाग आहे महाराजा ! अख्खं बंगळूर खाली दिव्यांनी झगमगत होतं...(कबीरा साठी घेतलेल्या छोट्या विमानाची आठवण ताजी झाली !) अधूनमधून पाण्याचे साठे दिसत रहातात. हळूहळू ते सारं काही अदृश्य होऊन नजरेसमोर ढगांची दाटी झाली तेव्हा कळलं की विमान वीस हजार फूट उंचीवरून उडतं आहे. बंगळूर नावाच्या निसर्गानं, हिरवाईनं नटलेल्या शहरात पाहण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत तशी ! कर्नाटकाच्या विधानसभेची इमारत तर सर विश्वेश्वरय्यांच्या कर्तृत्वाचा अजोड नमुनाच आहे.पण मुळात हे शहरच नितांत देखणं आहे. या नवीन विमानतलावरून हॉटेल वूडलॅंडकडे जातानाही प्रशस्त रस्ते आणि त्याच्या बाजूला नटटलेली झाडांची नक्षी, अधूनमधून डोकावणाऱ्या जुन्या वास्तूंचं देखणेपण...नजर बांधून ठेवणाऱ्या या शहरानं अनिल कुंबळे, राहूल द्रविड, गुंडाप्पा विश्वनाथ आदी महान क्रिकेटपटूही देशाला दिलेत ! अर्तात्, अलिकडे गर्दीमुळे वाहतुकीचा श्वास वारंवार कोंडत असला तरी. ठिकठिकाणी हिरवाईची उद्यानं तुमच्या नजरेला सुखावतात. ही हिरवाई असीच कायम राहो !
------------------------------------------
1 comment:
मस्त! खूपच छान...
Post a Comment