Wednesday, October 8, 2008

"श्री साईबाबाकी आरती'

रहेम करो मेरे साई। मेरे साईबाबा।।लतादीदींच्या गानभक्तांसाठी आणकी ेक खूषखबर !शिर्डीच्या साईबाबा मंदिरात नियमितपणे ऐकू येणाऱ्या या आरतीचे सूर "त्या' दिवशी स्टुडिओत गुंजत होते. त्याचं वेगळेपण इतकंच की ही आरती प्रत्यक्ष गानसम्राज्ञीच्या स्वरांत ध्वनिमुद्रित होत होती.....होय, साईमंदिरात रोज होणाऱ्या आरत्या देशविदेशांतील लाखो साईभक्तांना आता प्रत्यक्ष लता मंगेशकर यांच्या स्वरांत ऐकायला मिळणार आहेत. निमित्त आहे "श्री साईबाबाकी आरती' या नवीन अल्बमचं .या संचात एकूण अकरा आरत्या आहेत. त्यात घेऊनी पंचारती, शिर्डी माझे पंढरपूर, रहम करो मेरे साई, साई रहेम नजर करना, आदी रचनांचा समावेश आहे. तरूण संगीतकार मयुरेश पै यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली लतादीदींनी साईबाबांच्या निवडक आरत्या नुकत्याच ध्वनिमुद्रित केल्या आहेत. ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर याही यासाठी गायल्या आहेत. दीदी आणि उषाताई, असा समसमा संयोग कित्ती दिवसांनी होतोय महाराजा ! येत्या दसऱ्याच्या आसपास हा अल्बम बाजारात येणार आहे. ""वयाच्या ऐंशीव्या वर्षी दीदींनी साईबाबांना आपली स्वरसुमनांजली अर्पण केली आहे,' असे वर्णन पै यांनी केले. शिर्डीच्या साईबाबा मंदिरात रोज पहाटे सव्वापाच, दुपारी बारा, सायंकाळी साडेसहा व रात्री दहा अशा चार वेळेस साईबाबांची आरती होते. या आरती सोहळ्यास हजेरी लावण्यासाठी लाखो भाविक धडपडतात. यातील काही आरत्या तर साईबाबा शरीराने या जगात होते तेव्हापासूनच शिडी मंदिरात गायिल्या जातात. खुद्द लतादीदींची साईबाबांवर श्रध्दा आहे. गेले सुमारे अर्धशतकभर त्या गुरूवारचा उपवास देखील करतात. यापूर्वी त्यांनी ओम साई राम (संगीतकार -उत्तम सिंग) व मेरे साई (मयुरेश पै) हे साईभक्तीचे अल्बमही केले आहेत. मात्र शिर्डीच्या मंदिरात ज्या आरत्या गायल्या जातात त्या जर दीदींनी स्वतः गायिल्या तर जगभरातील साईभक्तांसाठी ती एक पर्वणीच ठरेल असा विचार पुढे आला. दीदीही तयार झाल्या आणि सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात मुंबईतील स्वरलता स्टुडीओत या आरत्यांचे ध्वनीमुद्रण झाले. लतादीदी व उषा मंगेशकर यांनी एकूण अकरा आरत्या दोन दिवसांत ध्वनिमुद्रित केल्या."अजि सोनियाचा दिनू' या अभंगातील ऑर्केस्ट्रा काढून फक्त तानपुराच ठेवला ाणि त्यानंतर झालेल्या ध्वनिमुद्रणानंतर त्यात "संताचा साधेपणा' आला, असे दीदींनीच एका मुलाखतीत सांगितले होते. साईबाबांच्या या ारत्या पारंपारिक आहेत. त्यांच्या मूळ चालींना धक्का न लावता आणि ऑर्केस्ट्राचा फारसा गोंगाट न करता या आरत्यांचे ध्वनिमुद्रण करण्यात आले. दीदी आणि उषाताई यांनी एकत्रपणे अनेक वर्षांनंनतर एखादी रचना गायिली आहे, हेही या अल्बमचे एक वैशिष्ट्य ठरेल. मुळात प्रत्यक्ष दीदी गाताहेत आणि या वयातही त्यांच्या आवाजाची जी अफाट रेंज कायम आहे, जे पावित्र्य त्यांच्या स्वरांतून ठायीठायी प्रतीत होते, ते पाहता साईबाबांसारख्या अवतारी महापुरूषाच्या आरत्यांचे मांगल्य त्यांच्या आवाजात आणखी झळाळून उठते, अशीच भावना या आरत्या ऐकणाऱ्याच्या मनात येते....

----------------------

जनपथावरचा पोपट !

दहा जनपथ? कुठे आहे रे भाऊ?दहा जनपथ....दिल्लीतील एक जगप्रसिध्द ठिकाण...जगातील सर्वाधिक प्रभावशाली महिलांपैकी एका नेतृत्वाचे, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे हे निवासस्थान. राजीव गांधी यांच्या काळापासूनच त्यांचे कुटुंबीय दहा जनपथ येथेच रहात आहेत. सोनिया या सत्तारूढ आघाडीच्या अध्यक्षा असल्याने साहजिकच दहा जनपथ वर कायम वर्दळ असते. कॉंग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री, नेते, नाराज नेते अशांची वर्दळ कायम येथे असते. एकदा एका नवख्या पत्रकाराला त्याच्या वरिष्ठानं सांगितलं, जा रे, जरा "दहा जनपथ' वर जाऊन ये...आपल्याला फार मोठ्ठी असाईनमेंट मिळाली, हा त्या पत्रकाराचा आनंद काही मिनिटांतच मावळला ! कारण पुढचा तासभर तो बिचारा दहा जनपथचा शोध घेत फिरत राहिला...इंडिया गेटपासून कॅनॉट प्लेसपर्यंत ! दहा जनपथ काही त्याला सापडेना . का? कारण? दहा जनपथ असे नाव असलेला बंगलाच येथे नाही. तो क्रमांकही कोणत्या बंगल्यावर नाही ! जनपथावरील "त्या' क्रमांकावर सध्या लालबहादूर शास्त्री यांचे स्मारक आहे. पण ते सर्वसामान्यांना कायम खुले नाही. सुरक्षेच्या कारणामुळे सोनियांच्या निवासस्थानी जाण्यासाठी 24 अकबर रस्ता, या कॉंग्रेसच्या मुख्यालया शेजारी असलेल्या गेटने आत जावे लागते. त्यामुळे दहा जनपथ वर अमूक तमूक गेले असे कळले की पत्रकारांची गर्दी अकबर रस्त्यावर होते !----------------------------------------जनपथावरचा पोपट !पोपटा पोपटा बोलतोस गोड...मला पण दे ना पेरूची फोड , या बालगीताची पुन्हा आठवण झाली ती दहा जनपथ च्या परिसरात. समर्थाघरच्या श्‍वानाला सर्व मान देतात हे माहिती आहे. पण समर्थाघरी एकादा पोपट असेल तर ? त्याबद्दल समर्थांनी बरीक काही लिहून ठेवलं नाही ! तर ऐका महाराजा, जगातील एक सामर्थ्यशाली शक्तीकेंद्र, सत्ताकेंद्र असलेल्या या परिसरात एक दर्गा आहे. दहा जनपथच्या बरोब्बर समोर जो चिंचोळा रस्ता जातो त्यावरील हा दर्गा बराच पुराणा ! जो सलग चार गुरूवारी रात्री (शबे-रात) येथे दर्शनाला येईल त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील, असा या दर्ग्याचा म्हणे लौकिक (नारायणराव, वाचताय ना !) तर विषय दर्ग्याचा नाही, तर त्या दर्ग्यातील फकीराने पाळलेल्या पोपटाचा आहे. त्याने एक पोपट पाळला आहे. मिठ्ठू-मिठ्‌ठू बरोबरच हॉं, ना, क्‍या है? वगैरे शब्द तो सफाईने बोलतो. त्याच्याशी बोलण्यात अनेकजण रंगून जातात. दहा-जनपथ वर कायम महत्वाच्या-अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या गाड्यांची वर्दळ असते. येथे आल्यानंतर पांढऱ्या कपड्यांतले खादीधारी बव्हंशी धास्तावलेल्या काळजाने आत जातात आणि या गाड्यांचा ताफाच्या ताफा याच दर्ग्याच्या चिंचोळ्या रस्त्यावरच लागतो. मग या गाड्यांचे चालक- कर्मचारी यांना निवांत वेळ मिळतो. यातील बरीच मंडळी दिवसभर येथे येऊन या पोपटाला तेथील टपरीवरूनच पेरू, मिरच्या, फळे वगैरे घेऊन देतात. हा पोपट "चाय, चाय' म्हणत चक्क चहाही आवडीआवडीने पितो. या पोपटाला म्हणे भविष्यही कळतं ! राजकारणी मात्र या पोपटाच्या वाऱ्याला फारसे उभे राहिलेले दिसत नाहीत....का ? अहो का म्हणून का विचारताय देवा ? कल्पना करा की एखाद्या दिवशी खुद्द मार्गारेट अल्वा आंटीच येथे फिरत फिरत आल्या. पोपटाशी बोलू लागल्या आणि या पोपटाने नारायण, नारायण ऐवजी विलास, विलास असा ध्वनी केला तर ? बाईंची अर्धशिशी अधिकच उफाळायची ना ! ( मैने सकाल मे पढा । क्‍या, क्‍या लिखा है तुमने,' अशी प्रेमळ दटावणी करायलाही बाईंना जागा उरणार नाही !) त्यामुळेच असेल कदाचित, पण राजकारणी मंडळी या बोलक्‍या आणि हुशार पोपटाकडे येतच नाहीत...अगदी, अगदी जुम्मे-रातलाही नाही !-----------------------------------------

शनिवार ते शनिवार.....

शनिवार ते शनिवार. दहशतवाद्यांनी देशाच्या राजधानीला एका पंधरवड्यात दुसऱ्यांदा बॉम्बस्फोटांनी हादरवले आणि नवरात्रीच्या तोंडावर सर्वसामान्य दिल्लीकरांच्या मनातील असुरक्षिततेची आणि हतबलतेची भावना पुन्हा टोकदार झाली. गेल्या 13 सप्टेंबरला दिल्लीच्या भरवस्तीत झालेले साखळी स्फोट, पुढच्याच शनिवारी संशयित अतिरेक्‍यांना चकमकीत मारल्याचा पोलिसांनी केलेला दावा आणि बरोबर आठ दिवसांनी म्हणजे आज झालेला हा बॉम्बस्फोट पाहता गुप्तचर संस्था आणि दिल्ली पोलिसांना आणखी "उघडे पाडणारे' हे स्फोट असल्याचे मानले जाते. गेल्या काही वर्षांत घातपाती कारवायांत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दाखविणाऱ्या अनेक घटना घडल्या. नुकतेच 13 सप्टेंबरला राजधानी दिल्लीतही साखळी बॉम्बस्फोट झाले. त्यानंतर दिल्लीत "हाय ऍलर्ट' जारी झाला, रस्त्यांवर पोलिसांची फौज वाढली, गस्त वाढली, चौकाचौकांत नाकेबंदी करण्यात आली, पण जेव्हा दहशतवाद आपली पाळेमुळे समाजात खोलवर रोवतो, तेव्हा असे उपाय प्रसंगी किती वरवरचे ठरू शतकात, हेही आजच्या स्फोटांनी ठळकपणे दाखवून दिल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गुप्तचर विभागाला आजच्याही स्फोटांची काहीही माहिती नव्हती आणि चकमकीचे श्रेय घेणारे दिल्ली पोलिसांची कार्यक्षमता (?) आठ दिवसांतच उघडे पडतात हेही दिसून आले आहे. "खबऱ्यांचे जाळे' विणण्यात गुप्तचर संस्था आज अपयशी ठरल्याचेही पुन्हा स्पष्ट झाले. कमी क्षमतेचे स्फोट, पण ते भरवस्तीत करून जास्तीत जास्त हानी करण्याचे आणि नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना टोकदार करण्याचे तंत्र तर दहशतवाद्यांना अवगत झाले आहेच; पण बॉम्बस्फोटांनंतरच्या शनिवारी पोलिस चकमक घडवून दोघा अतिरेक्‍यांना मारल्याचा दावा करतात त्याच्या आठव्याच दिवशी हे स्फोट घडवून दहशतवाद्यांनी पोलिसांना एक प्रकारे आव्हान दिल्याचेही मानले जाते. खोलवर झिरपलेल्या या दहशतवादाच्या भस्मासुराला मारणारे सरकार या देशात अस्तित्वातच नाही काय, हा प्रत्येकाच्या नजरेतला प्रश्‍न आज घटनास्थळी जमलेल्या नागरिकांच्या डोळ्यांमध्ये वाचायला मिळत होता. पोलिसांबद्दल तर महरौलीतील नागरिक फारच चिडून बोलताना आढळले. नवरात्रीचा उत्सव अवघ्या तीन दिवसांवर आला आहे. दिल्लीतही गेल्या काही वर्षांपासून नवरात्रीत गच्च गर्दीत चालणाऱ्या दांडियांची धूम असते. अशा स्थितीत आज पुन्हा झालेल्या या स्फोटांनी दिल्लीकरांच्या सुरक्षिततेपुढेच मोठे प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. संघटित दहशतवादाच्या सावटाखाली असलेल्या या राजधानीला त्यातून मुक्ती कधी मिळणार हा आज प्रत्येक दिल्लीकराचा सवाल आहे. सध्या तरी त्याचे उत्तर त्यांच्यावर राज्य करणाऱ्या कोणत्याच पक्षाकडे नाही. आज दुपारी ज्या महरौली भागात स्फोट झाले ती वेळ तुलनेने शांत असली तरी हा फूल बाजार हा कायम गर्दीचा भाग मानला जातो. कुतुबमिनारमुळे महरौली परिसरामध्ये देशी-विदेशी पर्यटकांचा राबताही सतत असतो. मात्र आजचा स्फोट ज्या पद्धतीने झाला तो एक घातपाती "अपघात' होता काय यादृष्टीनेही पोलिस तपासाची चक्रे फिरू लागली आहेत. एका जेवणाच्या डब्यात (टिफीन) बॉम्ब घेऊन मोटारसायकलवरून आलेल्या "त्या' युवकांनी फेकलेला डबा हा चुकून पडला असेल. त्याबद्दल त्यांना सांगावे, अशा भावनेने तो डबा हातात घेतलेल्या बालकाच्या शरीराच्या पुढच्या काही मिनिटांतच ठिकऱ्या उडाल्या. आजच्या स्फोटात मारल्या गेलेल्या वा जखमी झालेल्या नागरिकांमध्ये संतापाबरोबरच प्रचंड भीतीची भावना जाणवली. रोजीरोटीसाठी सकाळी घराबाहेर टाकलेले पाऊल पुन्हा घरात सुरक्षितपणे येईल याची खात्रीच नसल्याची भावना आज प्रत्येक सामान्य दिल्लीकर बोलून दाखवत आहे. राजकारणी लोकांवरचा त्याचा विश्‍वास कधीचाच उडाला आहे. त्यात आता भर पडली आहे एक प्रकारच्या हतबलतेची. दिल्ली महापालिकेत सत्ता भाजपची, तर विधानसभा आणि केंद्रात कॉंग्रेस आघाडीची. त्यामुळे आजही या रंगपंचमीला पुन्हा ऊत आला. यात ज्या सामान्यांच्या मतांवर आपण राज्य करतो त्याला सत्ताधाऱ्यांनीच वाऱ्यावर सोडले, अशी भावना लोकांमध्ये प्रबळ होताना दिसते, ती अतिशय घातक.