दहा जनपथ? कुठे आहे रे भाऊ?दहा जनपथ....दिल्लीतील एक जगप्रसिध्द ठिकाण...जगातील सर्वाधिक प्रभावशाली महिलांपैकी एका नेतृत्वाचे, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे हे निवासस्थान. राजीव गांधी यांच्या काळापासूनच त्यांचे कुटुंबीय दहा जनपथ येथेच रहात आहेत. सोनिया या सत्तारूढ आघाडीच्या अध्यक्षा असल्याने साहजिकच दहा जनपथ वर कायम वर्दळ असते. कॉंग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री, नेते, नाराज नेते अशांची वर्दळ कायम येथे असते. एकदा एका नवख्या पत्रकाराला त्याच्या वरिष्ठानं सांगितलं, जा रे, जरा "दहा जनपथ' वर जाऊन ये...आपल्याला फार मोठ्ठी असाईनमेंट मिळाली, हा त्या पत्रकाराचा आनंद काही मिनिटांतच मावळला ! कारण पुढचा तासभर तो बिचारा दहा जनपथचा शोध घेत फिरत राहिला...इंडिया गेटपासून कॅनॉट प्लेसपर्यंत ! दहा जनपथ काही त्याला सापडेना . का? कारण? दहा जनपथ असे नाव असलेला बंगलाच येथे नाही. तो क्रमांकही कोणत्या बंगल्यावर नाही ! जनपथावरील "त्या' क्रमांकावर सध्या लालबहादूर शास्त्री यांचे स्मारक आहे. पण ते सर्वसामान्यांना कायम खुले नाही. सुरक्षेच्या कारणामुळे सोनियांच्या निवासस्थानी जाण्यासाठी 24 अकबर रस्ता, या कॉंग्रेसच्या मुख्यालया शेजारी असलेल्या गेटने आत जावे लागते. त्यामुळे दहा जनपथ वर अमूक तमूक गेले असे कळले की पत्रकारांची गर्दी अकबर रस्त्यावर होते !----------------------------------------जनपथावरचा पोपट !पोपटा पोपटा बोलतोस गोड...मला पण दे ना पेरूची फोड , या बालगीताची पुन्हा आठवण झाली ती दहा जनपथ च्या परिसरात. समर्थाघरच्या श्वानाला सर्व मान देतात हे माहिती आहे. पण समर्थाघरी एकादा पोपट असेल तर ? त्याबद्दल समर्थांनी बरीक काही लिहून ठेवलं नाही ! तर ऐका महाराजा, जगातील एक सामर्थ्यशाली शक्तीकेंद्र, सत्ताकेंद्र असलेल्या या परिसरात एक दर्गा आहे. दहा जनपथच्या बरोब्बर समोर जो चिंचोळा रस्ता जातो त्यावरील हा दर्गा बराच पुराणा ! जो सलग चार गुरूवारी रात्री (शबे-रात) येथे दर्शनाला येईल त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील, असा या दर्ग्याचा म्हणे लौकिक (नारायणराव, वाचताय ना !) तर विषय दर्ग्याचा नाही, तर त्या दर्ग्यातील फकीराने पाळलेल्या पोपटाचा आहे. त्याने एक पोपट पाळला आहे. मिठ्ठू-मिठ्ठू बरोबरच हॉं, ना, क्या है? वगैरे शब्द तो सफाईने बोलतो. त्याच्याशी बोलण्यात अनेकजण रंगून जातात. दहा-जनपथ वर कायम महत्वाच्या-अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या गाड्यांची वर्दळ असते. येथे आल्यानंतर पांढऱ्या कपड्यांतले खादीधारी बव्हंशी धास्तावलेल्या काळजाने आत जातात आणि या गाड्यांचा ताफाच्या ताफा याच दर्ग्याच्या चिंचोळ्या रस्त्यावरच लागतो. मग या गाड्यांचे चालक- कर्मचारी यांना निवांत वेळ मिळतो. यातील बरीच मंडळी दिवसभर येथे येऊन या पोपटाला तेथील टपरीवरूनच पेरू, मिरच्या, फळे वगैरे घेऊन देतात. हा पोपट "चाय, चाय' म्हणत चक्क चहाही आवडीआवडीने पितो. या पोपटाला म्हणे भविष्यही कळतं ! राजकारणी मात्र या पोपटाच्या वाऱ्याला फारसे उभे राहिलेले दिसत नाहीत....का ? अहो का म्हणून का विचारताय देवा ? कल्पना करा की एखाद्या दिवशी खुद्द मार्गारेट अल्वा आंटीच येथे फिरत फिरत आल्या. पोपटाशी बोलू लागल्या आणि या पोपटाने नारायण, नारायण ऐवजी विलास, विलास असा ध्वनी केला तर ? बाईंची अर्धशिशी अधिकच उफाळायची ना ! ( मैने सकाल मे पढा । क्या, क्या लिखा है तुमने,' अशी प्रेमळ दटावणी करायलाही बाईंना जागा उरणार नाही !) त्यामुळेच असेल कदाचित, पण राजकारणी मंडळी या बोलक्या आणि हुशार पोपटाकडे येतच नाहीत...अगदी, अगदी जुम्मे-रातलाही नाही !-----------------------------------------
Wednesday, October 8, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment