Tuesday, November 11, 2008
अल्वा रूसल्या....काँग्रेस हसली !
काँग्रेसच्या जुन्याजाणत्या राष्ट्रीय सरचिटणीस मार्गारेट अल्वा या भलत्याच रूसल्या आहेत. राजीनाम्याचं अस्त्र उपसण्याइतक्या त्या चिडल्या आहेत. त्यांच्या या रागातून काय-काय जन्माला येते हे अल्वांना उजव्या हाताशी बसविणार्या पक्षश्रेष्ठींनाच ठाऊक ! मात्र वर्षानुवर्षे निवडणुकांत काँग्रेसच्या तिकीटवाटपाचं राजकारण करणार्या अल्वांना त्यातील पैशाचा खेळ समजण्यासाठी आताच साक्षात्कार कसा झाला हे एक गूढच आहे. काँग्रेसध्ये पैसे घेऊन तिकीटे वाटण्यात येतात असा आरोप अल्वाबाईंनी गेल्याच आठवडात केला आणि खळबळ उडाली. त्यांचा हा 'भावनिक उद्रेक' होता असे काँग्रेसने जाहीर केले. मात्र हा उद्रेक कोणत्या कारणातून आला हे मात्र पक्षाला नेमकेपणाने ठाऊक असणार ! ते काहीही असो, अल्वा यांच्या रागाचे तात्कालिक कारण मात्र कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मुलाचे कापलेले तिकीट हे आहे. कर्नाटकात काँग्रेसचे पानिपत झाले आणि धर्मांधांची फौज सत्ता सिंहासनावर जाऊन बसली....शांतताप्रिय ख्रिश्चनांवर प्राणघातक हल्ल्यांचे सत्रही नंतर सुरू झाले. पण विधानसभा निवडणुकीत आपल्या मुलाचे तिकीट कापण्यात आल्याचे प्रकरण अल्वाबाईंनी फारच मनाला लावून घेतले. आता त्या निवडणुकीत तिकीट मिळाले जरी असते तरी हे अल्वा चिरंजीव जिंकले असते काय याबाबत बी. के. हरिप्रसादांपासून जाफर शरीफ यांच्यापर्यंत अनेकांनी तेव्हाच साशंकता व्यक्त केली होती. मात्र, अल्वांचा खरा राग तीन जणांवर आहे. १) दिग्विजयसिंह, २) वायलर रवी व ३) पृथ्वीराज चव्हाण. त्यातही डिग्गी राजांवर त्यांचा फारच राग आहे. आणि अल्वाबाईंचे ज्यांच्याशी पटत नाही, त्यांचा त्या कशा रागराग करतात हे दिग्विजयसिंहांनी आपले 'पंढरी वारी दोस्त' (!) विलासरावांना विचारून घ्यावे. दिग्विजयसिंह यांनीच आपल्या मुलाचे तिकीट कापले असे अल्वाबाईंचे म्हणणे. आता काँग्रेसध्ये वर्षानुवर्षे तिकीटे कशी वाटतात हे अल्वाबाईंना ठाऊक नाही हे कसे होईल? महाराष्ट्रासह अनेक राज्यांत त्यांनी तेच तर राजकारण केले होते. ते काहीही असो या 'मार्गारेट'च्या राजीनाम्याचे हे प्रकरण काँग्रेसनेही थंडा करके खाओ, या धोरणानेच घेतले होते. त्यांच्याबाबत काहीच टोकाची प्रतिक्रिया व्यक्त न करता काँग्रसेने सरळ अँटनींच्या शिस्तपालन समितीच्या कोर्टात तो चेंडू टाकून दिला. अँटनींनी अंकलनी मॅगी आंटींशी चर्चाही केली. सूत्रांच्या महितीनुसार अँटनींनी अल्वांना 'बाई, जरा दमानं घ्या,' असंही सजावलं म्हणे! पण या अँटनी फवार्याने अल्वांचा भडका काही की झाला नाही. त्यांनी सरळ राजीनाम्याचे अस्त्र उपसले. शेवटी आई ती आई असली तरी ज्याप्राणे अल्वा या एक माता आहेत, तशा सोनिया याही एक आईच आहेत की ! तिकीटवाटपाची सूत्रे सांभाळणार्या या मातेच्या राहूल नामक पुत्रानेच अल्वांना धुडकावले. हे पाहता सोनियांनी अल्वांकडे का पाठ फिरविली हे अल्वामंधली आई नेमकेपणाने समजली असणार. आता त्यांचे हे अस्त्र पक्षश्रेष्ठींवर कितपत प्रभाव टाकू शकेल याची शंकाच आहे.....असो अल्वांना हा साक्षात्कार आताच कसा झाला याची अनेक कारणं आहेत. त्यांना महाराष्ट्राची जबाबदारी नको आहे असे सांगतात. त्यांच्या अन्य अनेक मागण्याही पडून आहेत. त्यांना काही राज्यांची जबाबदारी हवी आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपात त्यांना महत्वाची भूमिका हवी आहे. मत्र दहा जनपथवरून काहीच हालचाल दिसत नसल्याने अल्वा वैतागल्या आहेत. त्यांच्या रागाला निमित्त मिळाले ते तिकीटवाटपाचे. मात्र त्यांच्या या भूमिकेने काँग्रेसधील अनेकजणांना मनोमन आनंदच झाला आहे. योगेंद्र मकवाना हे खुलेपणाने पुढे आले. पण इतरही या रांगेत बसून 'अल्वाजी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है' असं म्हणत असणार. पण एक गोष्ट लक्षणीय. महाराष्ट्रात नारायण राणेंना दिल्ली-वार्यांसाठी हवा भरताना किंवा नागालँडधील बंडोबांना सातत्याने बळ देणार्या अल्वांना यानिमित्ताने पक्षातले खरे दुःख कळाले असेल. राणेंच्या फुटीर समर्थकांना पोटनिवडणुकांत तिकीटे देताना बाई, कोठे होता तुझा धर्म? असे त्यांना कोणी विचारू नये म्हणजे मिळविले!
----------------------------
Wednesday, October 8, 2008
"श्री साईबाबाकी आरती'
रहेम करो मेरे साई। मेरे साईबाबा।।लतादीदींच्या गानभक्तांसाठी आणकी ेक खूषखबर !शिर्डीच्या साईबाबा मंदिरात नियमितपणे ऐकू येणाऱ्या या आरतीचे सूर "त्या' दिवशी स्टुडिओत गुंजत होते. त्याचं वेगळेपण इतकंच की ही आरती प्रत्यक्ष गानसम्राज्ञीच्या स्वरांत ध्वनिमुद्रित होत होती.....होय, साईमंदिरात रोज होणाऱ्या आरत्या देशविदेशांतील लाखो साईभक्तांना आता प्रत्यक्ष लता मंगेशकर यांच्या स्वरांत ऐकायला मिळणार आहेत. निमित्त आहे "श्री साईबाबाकी आरती' या नवीन अल्बमचं .या संचात एकूण अकरा आरत्या आहेत. त्यात घेऊनी पंचारती, शिर्डी माझे पंढरपूर, रहम करो मेरे साई, साई रहेम नजर करना, आदी रचनांचा समावेश आहे. तरूण संगीतकार मयुरेश पै यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली लतादीदींनी साईबाबांच्या निवडक आरत्या नुकत्याच ध्वनिमुद्रित केल्या आहेत. ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर याही यासाठी गायल्या आहेत. दीदी आणि उषाताई, असा समसमा संयोग कित्ती दिवसांनी होतोय महाराजा ! येत्या दसऱ्याच्या आसपास हा अल्बम बाजारात येणार आहे. ""वयाच्या ऐंशीव्या वर्षी दीदींनी साईबाबांना आपली स्वरसुमनांजली अर्पण केली आहे,' असे वर्णन पै यांनी केले. शिर्डीच्या साईबाबा मंदिरात रोज पहाटे सव्वापाच, दुपारी बारा, सायंकाळी साडेसहा व रात्री दहा अशा चार वेळेस साईबाबांची आरती होते. या आरती सोहळ्यास हजेरी लावण्यासाठी लाखो भाविक धडपडतात. यातील काही आरत्या तर साईबाबा शरीराने या जगात होते तेव्हापासूनच शिडी मंदिरात गायिल्या जातात. खुद्द लतादीदींची साईबाबांवर श्रध्दा आहे. गेले सुमारे अर्धशतकभर त्या गुरूवारचा उपवास देखील करतात. यापूर्वी त्यांनी ओम साई राम (संगीतकार -उत्तम सिंग) व मेरे साई (मयुरेश पै) हे साईभक्तीचे अल्बमही केले आहेत. मात्र शिर्डीच्या मंदिरात ज्या आरत्या गायल्या जातात त्या जर दीदींनी स्वतः गायिल्या तर जगभरातील साईभक्तांसाठी ती एक पर्वणीच ठरेल असा विचार पुढे आला. दीदीही तयार झाल्या आणि सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात मुंबईतील स्वरलता स्टुडीओत या आरत्यांचे ध्वनीमुद्रण झाले. लतादीदी व उषा मंगेशकर यांनी एकूण अकरा आरत्या दोन दिवसांत ध्वनिमुद्रित केल्या."अजि सोनियाचा दिनू' या अभंगातील ऑर्केस्ट्रा काढून फक्त तानपुराच ठेवला ाणि त्यानंतर झालेल्या ध्वनिमुद्रणानंतर त्यात "संताचा साधेपणा' आला, असे दीदींनीच एका मुलाखतीत सांगितले होते. साईबाबांच्या या ारत्या पारंपारिक आहेत. त्यांच्या मूळ चालींना धक्का न लावता आणि ऑर्केस्ट्राचा फारसा गोंगाट न करता या आरत्यांचे ध्वनिमुद्रण करण्यात आले. दीदी आणि उषाताई यांनी एकत्रपणे अनेक वर्षांनंनतर एखादी रचना गायिली आहे, हेही या अल्बमचे एक वैशिष्ट्य ठरेल. मुळात प्रत्यक्ष दीदी गाताहेत आणि या वयातही त्यांच्या आवाजाची जी अफाट रेंज कायम आहे, जे पावित्र्य त्यांच्या स्वरांतून ठायीठायी प्रतीत होते, ते पाहता साईबाबांसारख्या अवतारी महापुरूषाच्या आरत्यांचे मांगल्य त्यांच्या आवाजात आणखी झळाळून उठते, अशीच भावना या आरत्या ऐकणाऱ्याच्या मनात येते....
----------------------
जनपथावरचा पोपट !
दहा जनपथ? कुठे आहे रे भाऊ?दहा जनपथ....दिल्लीतील एक जगप्रसिध्द ठिकाण...जगातील सर्वाधिक प्रभावशाली महिलांपैकी एका नेतृत्वाचे, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे हे निवासस्थान. राजीव गांधी यांच्या काळापासूनच त्यांचे कुटुंबीय दहा जनपथ येथेच रहात आहेत. सोनिया या सत्तारूढ आघाडीच्या अध्यक्षा असल्याने साहजिकच दहा जनपथ वर कायम वर्दळ असते. कॉंग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री, नेते, नाराज नेते अशांची वर्दळ कायम येथे असते. एकदा एका नवख्या पत्रकाराला त्याच्या वरिष्ठानं सांगितलं, जा रे, जरा "दहा जनपथ' वर जाऊन ये...आपल्याला फार मोठ्ठी असाईनमेंट मिळाली, हा त्या पत्रकाराचा आनंद काही मिनिटांतच मावळला ! कारण पुढचा तासभर तो बिचारा दहा जनपथचा शोध घेत फिरत राहिला...इंडिया गेटपासून कॅनॉट प्लेसपर्यंत ! दहा जनपथ काही त्याला सापडेना . का? कारण? दहा जनपथ असे नाव असलेला बंगलाच येथे नाही. तो क्रमांकही कोणत्या बंगल्यावर नाही ! जनपथावरील "त्या' क्रमांकावर सध्या लालबहादूर शास्त्री यांचे स्मारक आहे. पण ते सर्वसामान्यांना कायम खुले नाही. सुरक्षेच्या कारणामुळे सोनियांच्या निवासस्थानी जाण्यासाठी 24 अकबर रस्ता, या कॉंग्रेसच्या मुख्यालया शेजारी असलेल्या गेटने आत जावे लागते. त्यामुळे दहा जनपथ वर अमूक तमूक गेले असे कळले की पत्रकारांची गर्दी अकबर रस्त्यावर होते !----------------------------------------जनपथावरचा पोपट !पोपटा पोपटा बोलतोस गोड...मला पण दे ना पेरूची फोड , या बालगीताची पुन्हा आठवण झाली ती दहा जनपथ च्या परिसरात. समर्थाघरच्या श्वानाला सर्व मान देतात हे माहिती आहे. पण समर्थाघरी एकादा पोपट असेल तर ? त्याबद्दल समर्थांनी बरीक काही लिहून ठेवलं नाही ! तर ऐका महाराजा, जगातील एक सामर्थ्यशाली शक्तीकेंद्र, सत्ताकेंद्र असलेल्या या परिसरात एक दर्गा आहे. दहा जनपथच्या बरोब्बर समोर जो चिंचोळा रस्ता जातो त्यावरील हा दर्गा बराच पुराणा ! जो सलग चार गुरूवारी रात्री (शबे-रात) येथे दर्शनाला येईल त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील, असा या दर्ग्याचा म्हणे लौकिक (नारायणराव, वाचताय ना !) तर विषय दर्ग्याचा नाही, तर त्या दर्ग्यातील फकीराने पाळलेल्या पोपटाचा आहे. त्याने एक पोपट पाळला आहे. मिठ्ठू-मिठ्ठू बरोबरच हॉं, ना, क्या है? वगैरे शब्द तो सफाईने बोलतो. त्याच्याशी बोलण्यात अनेकजण रंगून जातात. दहा-जनपथ वर कायम महत्वाच्या-अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या गाड्यांची वर्दळ असते. येथे आल्यानंतर पांढऱ्या कपड्यांतले खादीधारी बव्हंशी धास्तावलेल्या काळजाने आत जातात आणि या गाड्यांचा ताफाच्या ताफा याच दर्ग्याच्या चिंचोळ्या रस्त्यावरच लागतो. मग या गाड्यांचे चालक- कर्मचारी यांना निवांत वेळ मिळतो. यातील बरीच मंडळी दिवसभर येथे येऊन या पोपटाला तेथील टपरीवरूनच पेरू, मिरच्या, फळे वगैरे घेऊन देतात. हा पोपट "चाय, चाय' म्हणत चक्क चहाही आवडीआवडीने पितो. या पोपटाला म्हणे भविष्यही कळतं ! राजकारणी मात्र या पोपटाच्या वाऱ्याला फारसे उभे राहिलेले दिसत नाहीत....का ? अहो का म्हणून का विचारताय देवा ? कल्पना करा की एखाद्या दिवशी खुद्द मार्गारेट अल्वा आंटीच येथे फिरत फिरत आल्या. पोपटाशी बोलू लागल्या आणि या पोपटाने नारायण, नारायण ऐवजी विलास, विलास असा ध्वनी केला तर ? बाईंची अर्धशिशी अधिकच उफाळायची ना ! ( मैने सकाल मे पढा । क्या, क्या लिखा है तुमने,' अशी प्रेमळ दटावणी करायलाही बाईंना जागा उरणार नाही !) त्यामुळेच असेल कदाचित, पण राजकारणी मंडळी या बोलक्या आणि हुशार पोपटाकडे येतच नाहीत...अगदी, अगदी जुम्मे-रातलाही नाही !-----------------------------------------
शनिवार ते शनिवार.....
Monday, September 15, 2008
एक अनुभव नीलाकाशातला !!
एक अनुभव नीलाकाशातला !!
-------------------------
आकाशातून, ता. 14 सप्टेंबर 2008 (! ) ः स्पाईस जेटच्या विमानात रात्री 8 वाजून 45 मिनिटांनी , 37 हजार फूट उंचीवरून मी लिहित असलेला हा मजकूर ! महाराष्ट्राच्या बाहेर घालविलेली गेल्या 35 वर्षांतली...आयुष्यातली ही पहिलीच अनंत चतुर्दशी. एक अनामिक हुरहुर वेढून राहिलेली....दरिदरीतून, मावळदेवा। देऊळ सोडून धाव रे..... काळी दोनमध्ये सफाईनं फिरणाऱ्या लताच्या मधाळ आवाजातल्या, शांता शेळकेंच्या या ओळी आठवल्या की काहीसा दिलासा मिळत रहातो ! या सायंकाळी भर विमानात काळजातून थेट लॅपटॉपच्या पडद्यावर अवतरणारी ही "मौनाची भाषांतरे !'बंगळूरचा चकाचक आंतरराष्ट्रीय विमानतळ......सायंकाळी सात वाजून वीस मिनिटांनी या विमानतळावर पत्रकारांची फौज 'अवतरते'...काही क्षणांतच विमानाकडे एका व्होल्वहो बसमधून प्रस्थान सुरू ! भाजप नावाच्या दिल्लीच्या तख्ताच्या दिशेने कूच करणाऱ्या पक्षाचा तीन दिवसांचा उरूस आज संपला आणि तो कव्हर करण्यासाठी दिल्लीहून आलेल्या 50 हून जास्त पत्रकारांना घरचे वेध लागलेले. कालच (13 सप्टेंबर 2008) दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटांनी अनेक कुटुंबवत्सलांचं चित्त घराकडे, घरांतल्या पिल्लांकडे लागलेलं.तरीही विमानाने हवेत झेप घेताच पत्रकारांची मूळ वृत्ती उफाळून आली आणि नंतर सुरू झाला एकच दंगा ! एक पत्रकार जागेवर बसलेला राहील तर शपथ !! हास्याचे फवारे उडत आहेत...जोरजोरात विनोद करणे, विमानातील विक्रीसाठींच्या वस्तूंवरून हवाई सुंदरीच्या फिरक्या घेणे हे सगळेच सुरू आहे. इतक्यात घोषणा होते, ""आम्ही आज वाढदिवसाच्या सुभेच्छआ देत आहोत ; संजय मयूर यांना. त्याबरोब टाळ्यांचा उस्फूर्त कडकडाट होतो. संजय हा भाजपच्या राष्ट्रीय कार्यालयातला कर्मचारी, पत्रकारांचा मित्र. हा मूळचा बिहारचा असला तरी त्याचे बोलणे उर्मट आणि असंस्कृत नसून अतिशय मार्दवयुक्त आहे. साहजिकच त्याच्या वाढदिवसानिमित्तच्या घोषणेला टाळ्यांचा कडकडाट होतो. खुद्द संजयला मात्र उपास आहे. कसला? तर अनंत चतुर्दशीचा ! गेली अनेक वर्षे मी हे व्रत करतोय, संजय सांगत असतो. बंगळूरला जाण्याच्या दिवशी (11 सप्टेंबर) जे विमान होते त्यात भाजपचे बरेच नेते होते. त्या दिवशी विमानात हिमाचलाचे माजी मुख्यमंत्री शांताकुमार भेटले. हिमाचलच्या निवडणूक दौऱ्यात नुरपूर-जस्सौर पट्ट्यात मी त्यांची मुलाखत घेतली होती. त्यांना तीही पक्की लात आहे...पक्का राजकारणी नेता ! त्यांचाही वाढदिवस त्या दिवशी होता ामि तो विमानातच साजराही झाला. पण कोरडेपणाने. संजयने आपुलकीने दिलेल्या लिंबाच्या सरबताच्या बाटलीतील सरबताची चव आमि तो उत्साह शांताकुमारांच्या अभिनंदनावेळी दिसतच नव्हता. ...आज संध्याकाळी हॉटेल वूडलॅंडमधून व्होल्हे बसने निघून बंगळुरूच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाय ठेवला तेव्हा सर्वांनाच एक प्रकारचं हायसं वाटू लागलेलं. रात्री आठ वाजून तीन मिनिटांनी विमानानं हवेत उड्डाण घेतलं आणि झगमगतं बंगळूर शहर खाली दिसू लागलं. उतरली तारकादळे जणू नगरात....(सलाम कुसुमाग्रज !) हा अनुभव याचि देही याचि डोळा पाहिला. ही अविस्मरणीय अनुभवाची कुपी शब्दांत बध्द करता येणारी नाहीच प्रत्यक्ष अनुभवण्याचाच हा भाग आहे महाराजा ! अख्खं बंगळूर खाली दिव्यांनी झगमगत होतं...(कबीरा साठी घेतलेल्या छोट्या विमानाची आठवण ताजी झाली !) अधूनमधून पाण्याचे साठे दिसत रहातात. हळूहळू ते सारं काही अदृश्य होऊन नजरेसमोर ढगांची दाटी झाली तेव्हा कळलं की विमान वीस हजार फूट उंचीवरून उडतं आहे. बंगळूर नावाच्या निसर्गानं, हिरवाईनं नटलेल्या शहरात पाहण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत तशी ! कर्नाटकाच्या विधानसभेची इमारत तर सर विश्वेश्वरय्यांच्या कर्तृत्वाचा अजोड नमुनाच आहे.पण मुळात हे शहरच नितांत देखणं आहे. या नवीन विमानतलावरून हॉटेल वूडलॅंडकडे जातानाही प्रशस्त रस्ते आणि त्याच्या बाजूला नटटलेली झाडांची नक्षी, अधूनमधून डोकावणाऱ्या जुन्या वास्तूंचं देखणेपण...नजर बांधून ठेवणाऱ्या या शहरानं अनिल कुंबळे, राहूल द्रविड, गुंडाप्पा विश्वनाथ आदी महान क्रिकेटपटूही देशाला दिलेत ! अर्तात्, अलिकडे गर्दीमुळे वाहतुकीचा श्वास वारंवार कोंडत असला तरी. ठिकठिकाणी हिरवाईची उद्यानं तुमच्या नजरेला सुखावतात. ही हिरवाई असीच कायम राहो !
------------------------------------------